चुलीवरचे जेवण!

चुलीवरचे जेवण! (मुंबई सकाळ, रायगड टुडे 23 ऑगस्ट 2019) महामार्गावरून सुस्साट गाडी निघालीय. दुपारच्या जेवणाची वेळ झालेली. प्रवाशांच्या पोटात कावळे ओरडण्याची स्थिती. पोटातली भूक डोळ्यांवर स्वार होऊन हे प्रवासी रस्त्याच्या कडेचे फलक अधाशीपणे वाचू लागलेत. हॉटेल, ढाबा, खाणावळी या अपेक्षीत नावांच्या रांगेत आणखी एक फलक लक्ष वेधून घेतो. ते विशिष्ट नाव वाचून आपसूकच गाडीचा वेग कमी होऊन, चाके त्या शब्दांच्या दिशेने वळली जातात. पोटातली भूकेची अाग अधिकच उसळवणारे ते शब्द असतात, “चुलीवरचे अस्सल गावरान जेवण”. सध्याच्या काळात चलती असणारा म्हणजेच ‘ट्रेंड’मध्ये असणारा हा प्रकार. तसे पाहता ‘चुलीवरचे जेवण’ हा प्रकार आपल्याला नविन नाही. रायगड जिल्ह्यातील कोणतेही गाव घ्या, गावात चूल नाही असे गाव शोधूनही सापडत नव्हते. ‘घरोघरी मातीच्या चुली” ही म्हण सत्यात उतरवणारा हा परिसर. इथे अग्नीदेवाच्या आग्नेय स्थानाला इतर काही असेल नसेल, पण चूल होतीच. काही घरांमध्ये तर दोन-दोन चुली असायच्या. दोन्ही चुलींचे कार्य आणि ध्येय वेगवेगळे. यातील एक चूल शक्यतो आं...