Search This Blog

Friday, October 20, 2023

शीतलादेवी

शीतलादेवी!




     महाराष्ट्रात, गावोगावीच्या वेशींपाशी शेंदूर फासलेले ओबडधोबड आकारातील ग्रामदेवतांचे तांदळे पहायला मिळतात. म्हसोबा, विरोबा, वेताळदेव, बापदेव, गावदेवी यांसारख्या देवता सर्वत्रच आहेत. या देवतांपैकीच एक वैशिष्टयपूर्ण देवता म्हणजे ‘शितलादेवी’ अथवा ‘शीतळादेवी’.  रायगड मधील अलिबाग जवळील चौल नाक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर शीतलादेवीचे मंदिर आहे. हे मंदिर पुरातन असून, त्याकाळापासून प्रसिद्ध आहे. शीतलादेवीचे हे जागृतस्थान समजले जाते. खरंतर हे मंदिर चौलच्या दक्षिणेस खाडीजवळ बांधले होते. परंतु कालांतराने ही खाडी गाळ व भरावाने व्यापून जमिनीचा भाग वाढला आहे. यापूर्वी एकदा मंदिराचा जीर्णोद्धार १७५९ मध्ये झाला होता. आंगरे घराण्याची या देवतेवर दृढ भक्ती होती. सध्या पूर्वीचे  लाकडी व कौलारू मंदिर पाडले असून त्याच जागेवर १९९० साली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन सिमेंट कॉन्क्रीटचे मंदिर बांधण्यास सुरूवात झाली. जीर्णोद्धार करताना गाभाऱ्यातील देवीच्या मूर्तीची मूळ जागा तीच ठेवण्यात आली आहे. शीतलादेवीच्या दर्शनासाठी रायगडसह सातारा, पुणे, रत्नागिरीहूनही बरेच भाविक दर्शनासाठी येतात.


   याच जिल्ह्यातील उरण तालुक्यातील दिघोडे येथील शीतलादेवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. दिघोडे-पनवेल रस्त्यानजिक असणारे हे लहानसे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरामध्ये शीतलादेवीसह इतर भग्न अवस्थेतील शेंदूरचर्चित मूर्ती आहेत. या मूर्तींच्या आधारे हे स्थान पुरातन असल्याचे लक्षात येते. नविन पनवेल येथील शीतलादेवीचे मंदिरही सुप्रसिद्ध आहे. या मंदिरांबरोबरच पालघर जिल्ह्यातील केळवे  येथे स्थानापन्न असलेली शीतलादेवी खूप प्रसिद्ध आहे. यापैकी बऱ्याच ठिकाणी साधारण कोरीव दगड ही शितळा म्हणून पुजली जाते. शीतलादेवीच्या जुन्या काळातील कोरीव प्रतिमाही आढळल्या आहेत. सर्वसामान्यपणे देवीच्या चतुर्भूज मूर्ती आढळतात. परंतु काही ठिकाणी सहा, आठ, दहा आणि  बारा हात असलेल्या प्रतिमाही मिळाल्या आहेत. स्कन्द पुराणात शीतलाष्टक नावाने देवीचे स्तोत्र दिले आहे. स्वत: भगवान शंकराने ही रचना केल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर शीतला देवीची आराधना करण्यासाठी पुढील मंत्र म्हटला जातो.
“वन्देऽहंशीतलांदेवीं रासभस्थांदिगम्बराम्।।
मार्जनीकलशोपेतां सूर्पालंकृतमस्तकाम्।।
    अर्थात, गाढवावर विराजमान, दिगम्बरा, हातात झाडू आणि कलश धारण करणारी, मस्तकावर सूपाचे अलंकार घालणाऱ्या शीतला देवीला मी वंदन करत आहे.


 उत्तरप्रदेशात चैत्र महिन्याच्या कृष्णाष्टमीपासून शीतळादेवीच्या पूजेस प्रारंभ होतो. साधारणपणे आषाढ महिन्यापर्यंत येणारी प्रत्येक कृष्णाष्टमी देवीचा पूजा दिवस असतो. या दिवशी शीतला देवीची पूजा आणि बासोडा म्हणजेच शीळे जेवण करण्याची पद्धत आहे. देवीचे प्रमुख आयुध खूर आणि वाहन गाढव आहे. काही ठिकाणी अक्षमाला, कलश, धनुष्य, बाण, ढाल, त्रिशूल, डमरू, केरसुणी यांसारखी आयुधेही पहायला मिळतात. यांतील गाढव हे वाहन व हाती केरसुणी ही  रचना अक्कादेवी नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठा या देवतेशी साम्य दर्शवणारी आहे. गोवर, कांजिण्या, देवी वगैरे रोगांशी संबंधित असलेल्या या देवता. या रोगांचा संसर्ग झाल्यानंतर होणारा त्रास कमी करण्यासाठी शीतलादेवीची पूजा करण्याची व देवीची गाणी म्हणजेच बायांची गाणी म्हणण्याची प्रथा अजूनही काही भागांत आहे. या सर्व कृतीतून रोग बरा होण्याची भावना या श्रद्धाळूंमध्ये असते.
     आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावून त्याप्रमाणे प्रतिसाद देणे हे तसे सर्व सजीवांचे वैशिष्ट्य. या सजीवांपैकीच एक असणाऱ्या मनुष्यप्राण्याचा इतिहास लाखो वर्षांचा. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे आपल्या एका पुस्तकात म्हणतात, “एखादा गूढ आवाज आला तरी तो कुठून आला हे कल्पनेने शोधण्याच्या प्रयत्नात मनुष्याने अदृश्य प्राणी निर्माण केले. नाना तर्क करून त्याने  भुते, यक्ष, देव, दानव, अप्सरा, गंधर्व, वेताळ, पिशाच इत्यादी बाबी कल्पिल्या; नंतर त्यांच्या राहण्याच्या जागा, स्थळे, प्रदेश व लोक निर्माण केले, आणि शेवटी त्यांच्या गुणाप्रमाणे रूपे निर्माण केली. इतकेच करून मनुष्य थांबला नाही, तर हे अदृश्य प्राणी रागावले तर पूजा, नैवेद्य व बळी देऊन त्यांची मर्जी संपादण्याचे मार्ग ठरवले. माणूस दचकला, आजारी पडला, आजाराचे स्पष्ट कारण कळेना यातून भूताची कल्पना केली. सुष्ट व दुष्ट भुते निर्माण झाली. वीज पडून मनुष्य मेला म्हणजे इंद्राने आपल्या वज्राने मारिला व पटकीने मेला म्हणजे मरीदेवीने मारला अशी भ्रांत समज असायची.”
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातील भयंकर रोगांच्या साथी व हतबल झालेले लोक पाहता, जुन्या काळातील रोगांच्या साथींना तत्कालीन समाजाने दैवी प्रकोप मानणे स्वाभाविकच होते. 
    काळ बदलला असला तरी भाविकांची आपल्या श्रद्धेयाप्रती असणारी भावना कालातीत आहे. शीतलादेवी ही स्वच्छतेचे अधिष्ठान असलेली देवता आहे. तिच्या हातात असलेली केरसुणी व माथ्यावरील सूप स्वच्छतेचे आवाहन करणारी आहे. या देवतेला प्रसन्न करणे म्हणजेच आपल्या आजूबाजूला स्वच्छता राखणे हाच अर्थ सद्य:काळात उपयुक्त ठरणारा आहे.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Thursday, May 11, 2023

इस सिमेंट में जान है!






    “इस सिमेंट में जान है!” असे म्हणत आपल्या सिमेंटची वैशिष्ट्ये सांगणारी जाहीरात आठवत असेल. या कंपनीचे सिमेंट वापरून केलेले बांधकाम किती मजबूत आहे, हे ग्राहकांच्या मनात ठसवण्यासाठी अशी टॅगलाईन वापरली गेली. उत्पादनाचे वर्णन करताना अतिशयोक्तीचा वापर करण्याची अशी पद्धत जवळपास सर्वच कंपन्या वापरतात. ‘ सिमेंट में जान’ वाले पण यातलेच.  पण प्रत्यक्षात ‘सिमेंट में जान’ असणारी एखादी गोष्ट असल्याबद्दल आपल्याला कोणी सांगीतली तर? ती देखील आपल्या घरात? होय, सिमेंटसदृश निर्जीव गोष्टींनी वेढलेली परंतु आतून सजीव असलेली ही गोष्ट आपल्या सभोवतालीच आढळते.

                            घराची साफसफाई करताना तुम्हाला भोपळ्याच्या बी प्रमाणे चपटी, दोन्ही टोकाला निमुळता आकार असणारे लहान कोश आढळले आहेत का? विशेषत: भिंतीतील फडताळांमध्ये, बाथरूमच्या कोपऱ्यांमध्ये अशा आकाराचे पण सिमेंट-मातीचा खरखरीत स्पर्श असणारे कोश दिसतात. काळजीपूर्वक पाहील्यास कधीकधी या सिमेंटसारख्या कोशाच्या आतून बाहेर डोकावणारा जीव दिसतो. ‘सिमेंट में जान’ असणारा हा जीव ‘प्लास्टर बॅगवर्म(Plaster Bagworm)’ या नावाने ओळखला जातो. टिनीएडी (Tiniedae) कुळातील या सजीवाचे शास्त्रीय नाव फेरीओका युटेरेला (Phereoeca uterella). हा सजीव इतर बॅगवर्मपेक्षा थोडा वेगळा असल्याने त्याला हाऊसहोल्ड केसबिअरर (Houbsehold Casebearer) असे म्हणने योग्य ठरेल. या कीटकाची अळी विशिष्ट द्रव स्रवते. पुढे हा द्रव आणि घराच्या भिंतीवरील रंग, सिमेंट, माती यांसह कपड्यातील रेशीम यांचा वापर करून आपला कोश तयार करते. या मजबूत कोशामुळे अळीची वाढ होताना  परभक्षींपासून संरक्षण मिळते. गिर्यारोहक ज्याप्रमाणे झोपण्याच्या पिशव्या (Sleeping Bags) वापरतात, तसाच काहीसा हा प्रकार. पण या पिशव्या आणि कोशातील महत्त्वाचा फरक म्हणजे आतील मोकळी जागा. कोशाच्या मधल्या वक्र भागाचा वापर करून ही अळी आतमध्ये फिरू शकते.

                                                                       हा ‘कोश’ हेच तिचे ‘विश्व’!
      ‘अन्न-वस्त्र-निवारा’ या मानवाच्या प्रमुख गरजा. यापैकी मानवाचे ‘वस्त्र-निवारा’ प्लास्टर बॅगवर्मला चांगलेच उपयोगी ठरतात. ज्या घराच्या भिंती, रंगासांठी आपण पैसे मोजलेले असतात, त्या घराचे सिमेंट-माती-रंग विनापरवानगी स्वत:च्या घरासाठी वापरणारा हा घरभेदी कीटक आपले कपडेसुद्धा सोडत नाही. तो रेशीम आणि लोकर खातो. कापसाचे तंतू त्याला खाता नसल्याने काही प्रमाणात आपली लाज राखली जाते. मनुष्यासह तो कोळ्याच्या घरातही घरफोडी करतो. कोळ्याचे जाळे हे त्याचे आवडते खाद्य. केशतंतू आणि कधी कधी आपल्याच भाईबंदांच्या कोशाचा भाग देखील त्याला अन्न म्हणून चालते.

      जवळपास अडीच महिन्यांचे जीवनमान लाभलेला हा सजीव बराचसा काळ कोशात व्यतीत केल्यानंतर अखेर पतंगरुपात(Moth) पोहोचतो. कोशातून बाहेर पडण्यास सज्ज होताना त्याला करड्या रंगाचे पंख फुटलेले असतात. अशा वेळी घरात बरेच रिकामे कोश आढळतात. प्रौढावस्थेतील पतंगांचे मिलन झाल्यानंतर मादी सुमारे २०० अंडी देऊ शकते. ही अंडी भिंतींच्या, दारांआडच्या फटींमध्ये व्यवस्थीतपणे लपवून सुरक्षित ठेवली जातात. दहा दिवसांनी या अंड्यांमधून जीव बाहेर पडतो.दमट वातावरणात ही प्रक्रीया वेगवान तर असतेच, पण यातील यशस्विततेचे प्रमाण अधिक असते. यामुळेच न्हाणीघर, शौचालय याठिकाणी प्लास्टर बॅगवर्मची संख्या सातत्याने वाढत राहते. घरातील संथ वावर, घरचाच रंग वापरून बनवलेला कोश यांमुळे हा केसबिअरर सहजपणे दिसून येत नाही. तसेच प्रौढावस्थेतील कीटकसुद्धा आकाराने लहान व बाजूच्या परिसरात मिसळणाऱ्या करड्या रंगाचा असल्याने सहज लपून राहू शकतो. हाउसहोल्ड केसबिअरर फारसा त्रासदायक नसला तरीही संख्येने वाढल्यास मात्र नुकसान करू शकतो. यासाठी घरातील कोळ्यांची जाळी काढून टाकणे, घरातील दमटपणा कमी होण्यासाठी हवा खेळती ठेवणे यांसारखे उपाय करता येतील. या कीटकांची संख्या वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे चिमण्यांची कमी झालेली संख्या. चिमण्यांसारखे लहान पक्षी या कीटकांना खातात. पण अलिकडच्या काळात चिमण्या कमी झाल्याने, तसेच त्यांना मनुष्याने आपल्या राहत्या जागेत वावरू न दिल्याने या पेटीवाल्याचे खूप फावले आहे. अन्नसाखळीत प्रत्येक सजीवाचे महत्त्व पटवून देणारे हे एक उत्तम उदाहरण आहे.
           विश्वकोशात नोंदही नसलेल्या असंख्य प्रकारच्या सजीवांनी भरलेल्या या जगातील एका लहानशा जीवाचे हे ‘कोशातील विश्व’... विश्वाच्या अनेक रहस्यांप्रमाणेच हा जीवसुद्धा अद्भुत आणि अतर्क्य.... आपल्या पोतडीत अशी विविध रहस्ये जपणाऱ्या जीवसृष्टीच्या या चमत्काराला सलाम!

-  तुषार म्हात्रे

(सदर लेख 'रयत विज्ञान पत्रिकेच्या अठराव्या अंकात प्रकाशित झाला आहे.)

Sunday, November 6, 2022

केजीएफची सुवर्णकथा

            स्टार यशला सुपरस्टार अशी ओळख मिळवून देणारा सिनेमा म्हणजे केजीएफ. प्रशांत नीलचे दिग्दर्शन, जबरदस्त एडीटींग आणि कोलारच्या सोन्याच्या खाणींची पार्श्वभूमी या सर्वांनी या चित्रपटाला सोनेरी यश मिळवून दिले. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या या कलाकृतीच्या दोन्ही भागांनी चांगलाच गल्ला जमवला. या मूळ कन्नड भाषेतील चित्रपटाची कथा काल्पनिक असली तरी ज्या ‘कोलार गोल्ड फिल्डस्’च्या अवतीभोवती हे कथानक घडते त्या खाणी मात्र खरंच अस्तित्वात आहेत. बेंगलुरू पासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर केजीएफ वसले आहे.


 फार पूर्वीपासूनच कोलारच्या खाणींमधून सोने मिळवले जात होते, अगदी सिंधू-संस्कृतीपासून.  ब्रिटिश काळात केजीएफ पुन्हा एकदा चर्चेत आले, जेव्हा इथे नव्याने सोन्याची खाण सापडली. या खाणींमधून त्याकाळी देशातील नव्वद टक्क्यांहून अधिक सोन्याचे उत्पादन होत होते. विसाव्या शतकाच्या सुरूवातीस सोन्याचे खाणकाम करण्याच्या बाबतीत भारत जगात सहाव्या क्रमांकावर होता. सोन्याचे सध्याचे मूल्य पाहता ही आकडेवारी लक्षणीय आहे. 


केजीएफ मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरील सोने आले तरी कुठून?

 या सोनेरी प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीच्या जन्मकथेपासून सुरूवात करावी लागेल. ही कथा आहे तब्बल साडेचारशे कोटी वर्षापूर्वीची. विश्वाच्या पसाऱ्यात नुकतीच जन्मलेली पृथ्वी तिच्या सध्याच्या रुपापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. मुख्यत: द्रवरूप लोखंड आणि इतर जड मुलद्रव्यांचा तो उष्ण गोळा होता. पुढे या गोळ्याला मोठ्या मोठ्या खगोलीय वस्तू येऊन टकरा देत होत्या. या धडकांनी तिची रासायनिक घडणच बदलून जात होती. आणखी साठ-सत्तर कोटी वर्षांनी पृथ्वी थंड होऊ लागली. पृथ्वीच्या थंड होण्यातून भूपृष्ठ तयार झाले. या भूपृष्ठावर अंतर्भागातील शिलारस येऊन सावकाशपणे थंड होऊ लागला

. या प्रक्रीयेतून ग्रॅनाईटसारखे खडक बनले. सावकाश थंड होण्याने  खडक कठीण बनतो आणि खनिजांचे स्फटिकही आकाराने मोठे होतात. यामुळेच पृथ्वीवर अनेक ठिकाणी ग्रॅनाईटचे गोलघुमटाकार खडक तयार झाले. बेंगलुरू-हैदराबाद मार्गात असे जमिनीतून उगवल्यासारखे राखाडी रंगाचे खडक तुम्हाला पहायला मिळतील.  हे दगड कठीण असले तरी शिलारसाचे थंड होणे सर्वत्र एकसारखे नसल्याने या घुमटांमध्ये उभे-आडवे सांधे तयार झाले. पुढे या खडकांची झिज होतानाही कांद्यासारखी वर्तुळे तयार झाली. असे झिजलेले खडक ‘Inselberg Rock’ म्हणून ओळखले जातात. बेंगलुरूच्या पूर्वेकडील कोलार परिसरात असे सांधे असणारे खडक आहेत. हे सांधेच केजीएफ साठी सोन्याचे लॉकर ठरले.

पण लॉकर म्हणजे सोने नव्हे; मग ही मोकळी तिजोरी सोन्याने कशी भरली गेली असावी? 

     भारताचे वर्णन करताना, “देशात एकेकाळी ‘सोन्याचा धूर’ निघत होता” असे म्हटले जाते. पृथ्वीच्या विचार करता इथे नुसता धूरच नाही, तर सोन्याचा वर्षावच झालेला आहे. आज पृथ्वीवर असलेले सर्व सोने कित्येक कोटी किलोमीटर अंतरावरील प्रचंड ताऱ्यांच्या पोटात घडलेले आहे. हे तारे मरताना खूप मोठे स्फोट झाले.

या स्फोटानंतर हेलियमसारखे वायू व धूळीचे ढग यांमध्ये काही धातू तयार झाले. सोने या नवधातूंपैकीच एक. यातूनच ताऱ्यांच्या विखुरलेल्या तुकड्यांपासून बनलेल्या लघुग्रहांना सोन्याचा स्पर्श झाला. अशा लघुग्रहांच्या, उल्कांच्या वर्षावातून आपल्या ग्रहावर सोने व इतर धातू आले. शास्त्रज्ञांच्या मते अंदाजे २५० कोटी वर्षापूर्वी एक मोठा लघुग्रह कोलार परिसरात धडकला. या खगोलीय वस्तूने आपल्या सोबत आणलेल्या सोन्याने ग्रॅनाईटच्या सांध्यांचे लॉकर भरले.

या आघाताने ग्रॅनाईटच्या सांध्यांमध्ये सोन्याच्या शिरा घडल्या.  सोने खनिज रुपाऐवजी शुद्ध रुपात आढळत असल्याने हे सोने वर्षानुवर्षे झळाळत राहीले. उन-वारा-पाऊस यांसारख्या घटकांमुळे खडकांची झीज होऊन सोन्याचे कण वाहून ओढे, नद्यांच्या काठी चमकू लागले. या चकाकत्या कणांनी पृथ्वीवर अलिकडेच दाखल झालेल्या मनुष्यप्राण्याचे लक्ष वेधले. मनुष्याच्या करामतीने इथले नैसर्गिक लॉकर उघडायला सुरूवात झाली. खाणकाम जोरात चालू लागले. इथल्या सुवर्णखाणींमुळे ब्रिटिशकाळात केजीएफ हे भारतात पूर्णपणे वीज पोहोचलेले पहिले शहर बनले. वीज पोहोचल्यानंतर येथील सोन्याचे उत्खनन आणखी वाढवण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने हा परिसर आपल्या ताब्यात घेतला. १९५६ मध्ये कोलार खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. पुढे भारत गोल्ड माईन्स लिमिटेड कंपनीने याठिकाणी काम सुरू केले.

सुरुवातीच्या यशानंतर कंपनीच्या नफ्याचा आलेख दिवसेंदिवस खालावतच गेला. या पार्श्वभूमीवर, अखेर २००१ भारत गोल्ड माईन्स लिमिटेड कंपनीने येथील खाणकाम थांबवण्याचा निर्णय घेतला. केजीएफ थांबले असले तरी मनुष्याचा हव्यास थांबलेला नाही. त्याचा वरवर निरर्थक वाटणाऱ्या मौल्यवान वस्तूंचा शोध सुरूच आहे. आता सुवर्ण-रत्नांच्या शोधांत पृथ्वी खोदून झाल्यानंतर त्याची नजर अवकाशाकडे न जावो म्हणजे झालं!

-- तुषार म्हात्रे

संदर्भ: इंडिका- प्रणय लाल

Friday, October 28, 2022

उकळणारे दगड

‘उकळणारे दगड’

           गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण जगाला ज्याची तिव्रतेने गरज भासली असा घटक म्हणजे ‘ऑक्सीजन’. हवेतील उपलब्ध ऑक्सीजन पुरेशा स्वरूपात मिळवू न शकणाऱ्या कोविडबाधित रुग्णांना वैद्यकीय ऑक्सिजनच्या माध्यमातून  उपचार केले जात आहेत.


हवेतून जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळविण्याच्या काही पद्धतींपैकी ’निवडक अधिशोषण (Selective Adsorption)’ ही एक चांगली पद्धत आहे. सुप्रसिद्ध ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ यंत्रांमध्ये हे तंत्र वापरले जाते.  यात हवेसारख्या वायूंचे मिश्रण एका विशिष्ट खनिजापासून बनवलेल्या पृष्ठाच्या पात्रामधून सोडले जाते. हा खास पृष्ठभाग नायट्रोजन शोषतो. त्यामुळे या पात्रामधून जो वायू बाहेर पडतो त्यामध्ये आधीच्या तुलनेत जास्त ऑक्सिजन असते. हा पृष्ठभाग ज्या खनिजापासून बनवला जातो ती खनिजे तुम्हाला अक्षरश: रस्त्यावर सापडतील. पनवेल परीसरात राहणाऱ्यांना ही खनिजे पहायची असल्यास राष्ट्रीय महामार्ग-४बी लगत ‘डोंबाला कॉलेज’ प्रवेशद्वाराजवळील एका मोकळ्या भूखंडावर पहायला मिळतील. इथे भरावासाठी अंथरलेल्या दगडांमध्ये  काचेसारखे चमकणारे स्फटीकदगड सर्वत्र पसरलेले दिसतील. हे चमकणारे दगड म्हणजेच  ‘झिओलाईट’ नावाचे खनिज.

आजूबाजूचा परिसर पाहता हे दगड इथले नसून जवळच्या दुसऱ्या भागातून भरावासाठी आणले गेले असावेत, असे वाटते. रायगड परिसराचा विचार केल्यास जासईजवळील दगडखाणींत आणि वरंध घाट रस्त्याला झिओलाईट खनिजांचे निक्षेप आढळतात. या दोन्ही जागांची नोंद रायगड गॅझोटिअरमध्येही आढळते. या खनिजाचा महाराष्ट्रातील आढळ पाहता ‘दख्खनच्या पठाराला’ झिओलाईटसचे माहेरघर समजायला हरकत नाही. साधारणत: सहा ते सात कोटी वर्षापूर्वी क्रेटेशियस काळ संपताना उसळलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात या भूभागाची निर्मिती झाली. त्यातूनच आपल्या दगडांच्या देशात बेसॉल्ट खडक तयार झाला. या खडकाच्या पोकळ्यांमध्ये झिओलाईटसारखी खनिजे तयार झाली. पृथ्वीच्या शब्दश: ज्वलंत इतिहासाचे हे पुरावे आहेत. इतरत्र अमेरिका, जपान, इटली, आफ्रिका येथेही झिओलाईटस मोठ्या प्रमाणात सापडतात. 

       झिओलाईटची नामकरण कथाही या दगडांसारखीच आकर्षक आहे. स्विडनमधील अ‍ॅक्सेल क्रॉन्टेड नामक शास्त्रज्ञाने एका प्रयोगात काही खनिजे तापवली. ही दगडखनिजे तापवल्यावर त्यातून पाण्याचे बुडबुडे व वाफ बाहेर येऊ लागली. हे ‘उकळत्या दगडांसारखे’ दृश्य पाहून या खनिजाला उकळणारे दगड या अर्थाने 'झिओलाईट' हे नाव मिळाले. ग्रीक भाषेत ‘झिओ (Zeo)’ म्हणजे उकळणारे आणि ‘लिथॉस(lithos)’ म्हणजे दगड. या खनिजांचे आजघडीला जवळपास पन्नास प्रकार ज्ञात आहेत. क्लिनोप्टीलोलाईट, इरिओनाईट, हेलँडाईट इ. प्रकारची झिओलाईट असतात.यांत खनिजांमध्ये असलेल्या सिलिकॉन, अ‍ॅल्युमिनियम, ऑक्सिजन या मूलद्रव्यांच्या ठराविक रचनेमुळे झिओलाईटच्या रेणूंना विशिष्ट आकार प्राप्त होतो. ह्या रेणूंमध्ये असलेल्या सूक्ष्म छिद्रांमुळे स्फटिकामध्ये लहान वाहिन्या तयार होतात. त्यांत पाणी साठून राहते. झिओलाईट तापविले की हे पाणी उकळू लागते व त्यातून बुडबुडे व वाफ बाहेर येते. आतील पाणी वाफेच्या रुपात बाहेर पडल्यानंतरही खनिजाच्या आकारात, त्यातील छिद्रात काही बदल होत नाही. या शुष्क खनिजात पोकळ छिद्रांची जाळी तयार होते. या सूक्ष्म जाळीतून निरनिराळ्या आकाराचे रेणू चाळून वेगळे करता येतात. या चाळणीची गंमत म्हणजे, घरातल्या चाळणीतून जसे मोठे कण चाळले जातात तसे न होता इथे लहान कण चाळण्यामध्ये अडकतात. जाळीतील छीद्रे लहान असल्याने यात लहान कण अडकतात व मोठे कण बाहेर पडतात. म्हणजे, यातून वायूचे किंवा द्रवाचे मिश्रण जाऊ दिल्यास त्यातील छिद्रांच्या आकाराचे रेणू त्यात पकडले जातात व मोठे रेणू निघून जातात.


  अनेक उद्योगांत झिओलाईटला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत आहे.  पेट्रोलियम उद्योग, कागद उद्योग, रबर उद्योगात झिओलाईट वापरतात. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी झिओलाईटचा वापर वाढत आहे. प्रदूषण वाढविणारे ह वायू शोषून घेण्यासाठी झिओलाईटचा चांगला उपयोग होतो. कारखान्यातून सोडलेले अशुद्ध पाणी झिओलाईटमधून जाऊ दिल्यास त्यातील बरीच अशुद्धी शोषली जाते. किरणोत्सर्गी कचऱ्याचे शुद्धीकरण करण्यासाठीदेखील झिओलाईटचा उपयोग केला जात आहे.

 


    नवीमुंबई परिसरात होऊ घातलेल्या विमानतळ, औद्योगिक प्रकल्प, शहरीकरण या कारणांसाठी परिसरातील डोंगर जमिनदोस्त केले जात आहेत. या प्रक्रियेत वैविध्यपूर्ण सजिवसृष्टीसह इथली खनिजसंपत्तीही मातीमोल होत आहे. या ठेव्याचे मोल ओळखून त्याचा योग्य वापर करता येणे शक्य आहे का? याचा विचार व्हायला हवा. अर्थात त्यासाठी गरज आहे योग्य दृष्टीची. या खड्यांवरून परावर्तीत होणारा प्रकाश संबंधितांच्या डोक्यात पडावा ही अपेक्षा.

(वरील लेख ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या ई-दिवाळी विशेषांक २०२२ मध्ये प्रकाशित झाला आहे. 
संपूर्ण अंक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://drive.google.com/drive/folders/1afCcZXyB6n7LvxzmZbDztr9eEU0vOnh6)

-- तुषार म्हात्रे

Friday, July 8, 2022

खोटा तांदूळ

  ‘खोटा तांदूळ’

                काठघर हे बिहारमधील एक लहानसे खेडे. नावाप्रमाणेच नदीच्या काठावर वसलेले. गावाच्या कडेने फुलहर नदी वाहते. राजमहाल टेकड्यांमध्ये वसलेले हे गाव वाहणारे लहान ओढे आणि तळी यांनी सजले आहे. उंच-सखल खाचरांतून येथे भातशेती केली जाते. इतर सर्वसामान्य गावांप्रमाणेच संथपणे इथले व्यवहार चालतात.  या शांत गावात उत्साह निर्माण होण्यासाठी एखादा लग्नसोहळाही पुरेसा ठरतो. आपल्याकडील लग्नसोहळ्यांमध्ये जशा गंमतीजंमती घडतात, तशाच या उत्साही लग्नसोहळ्यांतही घडवून आणल्या जातात. इथे लग्नानंतर गावात दाखल झालेल्या नववधूची सासरच्यांकडून एक गंमतीदार परीक्षा घेतली जाते. ही सोपी पण फसवी परीक्षा असते तिच्या पाककौशल्याची.

या नववधूला तांदूळ देऊन त्याचा भात बनवायला सांगीतला जातो. या गंमतीविषयी अनभिज्ञ असलेल्या नव्या नवरीचा भात कितीतरी वेळ झाला तरी शिजत नाही. या प्रसंगाचा आनंद लुटल्यानंतर नववधूला तांदूळ न शिजण्याचे खरे कारण सांगीतले जाते. सासरच्यांनी नववधूला दिलेला न शिजणारा तांदूळ खरा नव्हताच मुळी. हा खोटा तांदूळ गावातील मुलांनी काठघरच्या ओढे व तळ्यांतून गोळा केलेला असतो. हा संपूर्ण तांदूळ म्हणजे निव्वळ खडे. हे अस्सल तांदळासारखे भासणारे क्वार्टझचे खडे राजमहाल पर्वत परीसरातील विहिरी व ओढ्यांच्या तळांशी सापडतात. समर्थ रामदासांनी दासबोध ग्रंथात पंचमहाभूतांचे वर्णन करताना उल्लेखलेल्या
“तंदुलामधें श्वेत खडे। तंदुलासारिखेच वांकुडे।
चाऊं जातां दांत पडे। तेव्हां कळे।।”
या ओव्यांची आठवण करून देणारे हे खडे. काठघरची गंमत तांदूळ शिजवण्यापुरती मर्यादित आहे हे नशिब, जेवण म्हणून वाढायची परंपरा असती खरेच दात पडायची वेळ आली असती.
हा दात पाडू शकणारा खोटा तांदूळ आला कोठून?
 गावकऱ्यांच्या मते, “शेकडो वर्षांपूर्वी एक तांदूळ वाहून नेणारे जहाज बुडाले. या जहाजातील तांदूळ किनाऱ्यावरून ओढ्यांमध्ये, तळ्यांमध्ये वाहत पसरला. तोच तांदूळ आता खड्यांच्या स्वरूपात मिळत आहे.” अर्थातच त्या तांदळाप्रमाणेच ही कथादेखील फसवीच आहे. जगभर सर्वत्र आश्चर्यकारक घटनांभोवती अशा दंतकथा निर्माण होत असतात, काठघरही त्याला अपवाद नाही. प्रत्यक्षात खोट्या तांदळाची खरी कथा याहूनही अधिक रंजक आणि महत्त्वपूर्ण आहे.


      ही कथा आहे सुमारे अकरा ते बारा कोटी वर्षापूर्वीची.  भारतीय उपखंड, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका खंड सख्खे शेजारी असण्याचा तो काळ. गोंडवाना खंडाचे हे सगळे सदस्य इतके जवळ होते की ऑस्ट्रेलियातल्या पर्थच्या मैदानावर क्रिकेटचा सामना आयोजित केला असता, तर सरावासाठी जवळचे मैदान म्हणून भारतातील गुवाहाटी चालू शकले असते. पण तिन मोठ्या ज्वालामुखींना हा शेजार बघवला नाही. त्यांचा उद्रेक झाला.

या उद्रेकाने हे शेजारी सुटे होऊ लागले. सागरतळाखाली जेव्हा शिलारस वर येतो पण सागरतळ भेदत नाही, अशा शिलारसाला प्लूम(Plume) म्हणतात.
या प्रचंड प्लूमने एका बेटाला जन्म दिला. सध्या या बेटाचे नामकरण केर्गुएलेन असे झाले आहे. याच शिलारसाच्या दबावाने आजचे शिलाँग पठार घडले. राजमहाल पर्वतामध्ये शिलारसाचे थिजलेले साठे तयार झाले. गंगा व ब्रम्हपुत्र यांनी आणलेल्या प्रचंड गाळाने अनेक शिलारस साठे झाकले गेलेत, पण झारखंडमधील पंचेट, सिम्रा या भागात असे साठे पाहता येतात. केर्गुएलेन निर्माण करणारा उद्रेक घरातल्या खोट्याखोट्या भांडणांसारखा लगेच शमणारा नव्हता, तो तब्बल पंचविस लाख वर्षे सुरू होता. 


या घटनेने वेगवेगळ्या प्रकारचे दगड घडवले. केर्गुएलेन घटनेच्या पहिल्या स्फोटात शिलारस भूपृष्ठावर सुमारे चार हजार चौरस किमी परिसरात पसरला गेला. या शिलारसात सिलिका अधिक प्रमाणात होती. सिलिका जास्त असेल तर शिलारस अधिक दाट असतो. त्यात वायूही जास्त असतो. तो स्फोटक वेगाने पृष्ठावर येतो. दहा-बारा कोटी वर्षांपूर्वी राजमहाल पर्वतांमध्ये हा उद्रेक झाला तेव्हा सिलिकाचे थेंब हजारो फूट हवेत उडाले. गुरूत्वाकर्षणाने खाली येताना ते पावसाच्या थेंबाप्रमाणे लांबोळके झाले. थंड होऊन त्यांचे खडे झाले. पुढच्या कोट्यावधी वर्षात हे पावसापाण्याने झिजून गुळगुळीत झाले. हे काचमण्यांसारखे क्वार्टझचे दाणे तांदळासारखे दिसू लागले आणि काठघरच्या लोकांना गंमतीसाठी साधन मिळाले. काठघरप्रमाणेच लहान लहान भौगौलिक घटनांचे भक्कम पुरावे जगभर विखुरले आहेत. त्याआधारे इंडोनेशियातील तोबा, क्राकाटोआ व तांबोरा या बेटांवरही असेच ज्वालामुखीचे स्फोट झाल्याचे सांगता येते. 
    थोडी शोधक दृष्टी ठेवली तर आपल्यालाही दगडांची भाषा कळेल. या भाषेत लिहिलेला वसुंधरेचा हा इतिहास वाचता येईल. तो देखील थोडाथोडका नव्हे तर तब्बल चारशे साठ कोटी वर्षांचा...
आणि हो...आता जेवताना एखादा खडा लागलाच तर नीट पहा, कदाचित कोट्यावधी वर्षापूर्वीचा इतिहास तुम्ही चघळला असावा!
(संदर्भ: इंडिका - प्रणय लाल)

- श्री. तुषार म्हात्रे

Friday, May 13, 2022

खुन्याची आरी: एका गुहेचा पुनर्शोध

          “कधी जायचं?” 
या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं. ‘शोध’ या आवडीच्या गोष्टीसाठी सवड काढावीच लागते. तसेही जायचे ठिकाण मुख्य रस्त्यापासून फार अंतरावर नाही. पण तिथे जाण्यासाठी शब्दश: वाट वाकडी करावी लागते. यावेळेस किल्ले संवर्धनाच्या कामात सातत्याने राबणारा, पायाला भिंगरी लागल्यागत भटकणारा विजय आणि ऐतिहासिक गोष्टी शोधक नजरेने, कॅमेऱ्याने टिपणारा अभिषेक या दोघांसोबत ही शोधमोहीम राबवायची ठरली.

      कळंबुसरे गावाच्या पश्चिमेस आणि मोठीजुईच्या दक्षिणेस असणाऱ्या डोंगरावर ’खुन्याची आरी’ नावाची जागा आहे.  डांबरी रस्ते निर्माणाच्या आधी या डोंगराच्या कडेने रहदारीचा रस्ता होता. नावाप्रमाणेच या रस्त्याला लुटमार होऊन ‘खून’ व्हायचे म्हणून ‘खुन्याची आरी’ नाव पडल्याची एक कथा सांगीतली जाते; तर रस्त्याला विशिष्ट खुण असलेली जागा म्हणूनही हे नाव पडले असावे असाही एक ‘अंदाज’ आहे. याच जागेत ही गूढ ‘पांडवांची गुहा’ आहे. उरण तालुक्यातील कळंबुसरे हे शिलाहारकालीन गधेगळ, स्तंभ आणि जुने शिवमंदिर असणारे गाव


याच शिवमंदिराजवळ बाईक ठेवून संध्याकाळच्या सुमारास ‘वाकडी वाट’ पकडली. ठाकर बांधवांच्या मळ्यांमधून जाणारी पायवाट संपल्यानंतर, चारचाकी वाहन जाऊ शकेल असा डोंगराला समांतर कच्चा रस्ता सापडला. इथून पुढचा टप्पा लहान चढाचा, पण रस्ता नसलेला. या भागात सध्या जाणेयेणे नसल्याने काट्याकुट्यांनी, गर्द झाडींनी वेढलेला भाग समोर दिसत होता. माहितगार व्यक्तींकडून  “पंधरा मिनीटांत तिथे पोहोचाल!” असे ऐकल्याचे आठवले. पण समोरचे चित्र पाहता ही पंधरा मिनीटे पृथ्वीलोकातील नसावीत याची खात्री पटली.  मार्ग काढण्यासाठी एखादा कोयता हाती असायला हवा होता. भटकंतीचा चांगला अनुभव असलेला विजय आज निश:स्त्र होता. नाही म्हणायला माझ्या पिशवीत ‘मीटरपट्टी’ होती, पण तिचा उपयोग फारतर काट्याकुट्यांतून गेल्यानंतर अंगावर किती लांबीचा ओरखडा उठलाय हेच मोजण्याइतका झाला असता. शेवटी विजयनेच पुढाकार घेत अजिबात मार्ग नसलेला मार्ग निवडला.

त्याच्या मागे आम्ही दोघे निघालो. रस्त्यातल्या प्रत्येक वनस्पतीचे, मातीचे अवशेष अंगावर घेत आणि बदल्यात कपड्यांचे धागे काट्यांना भेट देत वर चढलो. मी हा भाग जवळपास पंचविस वर्षापूर्वी पाहीला होता. तेव्हा पाहीलेल्या  परिसराचा अंदाज घेत खुन्याची आरीची नेमकी जागा शोधत होतो. पण बराच शोध घेतल्यानंतरही गुहा सापडत नव्हती. शोध घेत एका बाजूला तीव्र उतार असलेल्या डोंगराच्या कडेने चालत राहीलो. दोन संभाव्य ठिकाणे पाहील्यानंतर तिसऱ्या जागेला खुणेचा भला मोठा दगड दिसला.


ही जागा पाहताच खात्रीचा ‘दिल में बजी घंटी’ सारखा अनुभव आला. एका बाजूने अभिषेकने आणि दुसरीकडून विजयने गुहेची पाहणी केली. मी मात्र गुहेचे सध्याचे दृश्य आणि आठवणीतील जुन्या दृश्यांची जुळणी करत होतो.


गुहेच्या रचनेत प्रचंड बदल झाला होता. एकेकाळी लहान झोपडीप्रमाणे असणारा प्रवेश भाग दगड माती खचल्याने अरूंद झाला होता. हे दोघेही या अरूंद भागातून आत उतरले.


त्यांच्या मागोमाग मीदेखील आत पोहोचलो. गुहेची पूर्ण पाहणी केली. दगडी गुहेच्या भागात छीन्नी हातोड्याचे घाव आढळले नाहीत. पर्यायाने ही ‘पांडवांची गुहा’ मानवनिर्मित असल्याची शंक्यता वाटत नाही. पण गुहेच्या एका दगडी भिंतीवर मानवी पंजाचा ठसा मी पूर्वी पाहीला होता. यावरून या नैसर्गिक गुहेत मानव राहीला असल्याचे खात्रीलायक सांगता येते. ही पाच बोटे पाच पांडवांची असल्याचा इथे समज आहे.

पूर्वी दुतोंडी असणाऱ्या या गुहेच्या मधल्या छताचा भाग पूर्ण कोसळला आहे, त्यामुळे मूळचा समांतर मार्ग बंद होऊन वरच्या दिशेला उघडणारा नवाच मार्ग तयार झाला आहे. गुहेसमोरील माती वाहून गेल्याने गुहेचे तोंड उताराकडे झुकले आहे. त्यातच आतल्या बाजूने पावसाच्या पाण्याने मार्ग काढल्याने दगड झिजले आहेत. दुर्दैवाने या पुनर्शोध मोहिमेत हाताचे ठसे सापडले नाहीत. एकतर ते मातीच्या ढिगाऱ्यात गाडले गेले असावेत किंवा दगड झिजून नष्ट झाले असावेत.

आणखी काही पावसाळे गेल्यानंतर ऐतिहासिक खुणा असलेली ही खुन्याची आरी हरवून जाण्याची शक्यता आहे. या जागेत एकदिवसाची संवर्धन मोहिम राबवल्यास गुहेचे आयुष्य वाढून अधिक माहिती मिळू शकेल. 
        पाहणीनंतर गुहेचे शक्य तितके फोटो काढले, अभिषेकने जागेचे महत्त्वपूर्ण मॅपिंग केले. ( https://goo.gl/maps/tVjuVm9RtiRnHmH3A ) गुहेच्या माथ्यावर बसून परिसरातल्या ऐतिहासिक ठेव्यांवर चर्चा केली.

सूर्य मावळतीला लागला होता. घरचे फोन (माझे एकट्याचेच!) वाजू लागले. भूतकाळातून वर्तमानकाळात यायची वेळ झाली. पुन्हा एकदा वाट नसलेल्या वाटेतल्या काट्यांना कपड्यांचे धागे देत, सोबत आमची आठवण म्हणून त्वचा-रक्त रुपाने डी.एन.ए. मागे सोडत खाली उतरलो; पुन्हा येण्यासाठी!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Friday, March 4, 2022

काष्ठशिल्प: जय-विजयचे

 

                नेहमीच्या पाहण्यातल्या गोष्टी जेव्हा आपण नव्या संदर्भाने पाहतो तेव्हा त्यातील वेगळेपणा लगेच नजरेत भरतो. गतकालीन इतिहासाचा शोध घेत असताना हे वारंवार घडते. शिलाहार काळाचा संदर्भ असलेल्या पिरकोनच्या शिवमंदिर परीसरात इतिहासातील अज्ञात पाने याच दृष्टीकोनामुळे सातत्याने प्रकाशात येत आहेत. आतापर्यंत मंदिरालगतचे विरगळ, सतीशिळा, गजलक्ष्मी, पुरातन शिवलिंग, नंदी यांबाबतचे लेखन सर्वांसमोर आले आहे. आता येथील एक लहानशी कलाकृती मंदिराभोवतीचे कुतूहल वाढवणारी ठरू शकते. ही कलाकृती एक ‘काष्ठशिल्प’ (लाकडी शिल्प) आहे. सद्यस्थितीत हे शिल्प मंदिरातील एका खिडकीत विराजमान आहेत. या काष्ठशिल्पांचे पुराणकाळातील संदर्भ ताडून पाहिल्यानंतर त्यांचा संबंध थेट हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपु, रावण, कुंभकर्णापर्यंत जाऊन पोहोचतो.

पुराणांत वर्णीलेल्या इतक्या महत्त्वपूर्ण व सुपरिचित व्यक्तीमत्त्वांशी संबंधित असलेले हे काष्ठशिल्प आहे तरी काय?

शंकर-विष्णू देवस्थान’ म्हणून नामोल्लेख असलेल्या या मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोर भगवान विष्णूची संगमरवरातील एक आधुनिक मूर्ती आहे. या मूर्तीच्या मागील बाजूच्या खिडकीवर दोन लहान आकाराचे लाकडी द्वारपाल आधाराने उभे केलेले दिसतात. कित्येक वर्षे जुन्या असलेल्या या कलाकृतीवर नव्याने रंगरंगोटी करून त्यांना सजवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. ही दोन्ही शिल्पे जिर्णोद्धारापूर्वीच्या मंदिर प्रवेशद्वारावर होती. आजूबाजूला विखुरललले दगडी अवशेष पाहता मूळ मंदिर हे भूमिज शैलीतले असावे. (भूमिज शैली म्हणजे सध्या ‘हेमाडपंती’ या चुकीच्या नावाने प्रसिद्ध असलेली शैली.) त्यानंतर झालेल्या स्थित्यंतरामध्ये मंदिर रचनेत अनेक बदल झाले. यातूनच खालचा भाग दगडी आणि वरचा भाग लाकडी अशी रचना तयार झाली. बहुधा याच काळात हे द्वारपालांचे काष्ठशिल्प तयार झाले असावे. हे द्वारपाल म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान विष्णूच्या दारावरील ‘जय व विजय’ आहेत. या दोघांची कथा त्यांच्या अंगावरील रंगांपेक्षाही अधिक रंगतदार आहे.श्रीमद्भागवत पुराणातील तिसऱ्या स्कंधाच्या पंधराव्या अध्यायात ही कथा वाचायला मिळते.


   “या कथेत सनकादी ऋषींचे वर्णन येते. हे सनकादी ऋषी म्हणजे सनक,सनंदन,सनातन आणि सनत्कुमार नावाचे चार ऋषी. सृष्टीकर्ता ब्रह्माचे मानसपुत्र असल्याने त्यांचा सर्वत्र मुक्त संचार असायचा. या ऋषींच्या तपोबलामुळे अधिक वय असूनदेखील त्यांना बालक रुप लाभले होते. एकदा सनकादी ऋषींना भगवान विष्णूचे दर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली. दर्शनासाठी बालकरुपातील  सनकादी ऋषी वैकुंठधामात पोहोचले. तिथे आपले जय-विजय नावाचे द्वारपाल वैकुंठाच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करत होते. लहान बालकांच्या मूळ रुपाचा परिचय नसल्याने या द्वारपालांनी त्यांना अडवले व त्यांची चेष्टा केली. या प्रकाराचा राग येऊन त्यांनी जय-विजय यांना पृथ्वीवर मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल असा शाप दिला. थोड्या वेळाने भगवान विष्णू तिथे पोहोचले. त्यांनी सनकादी ऋषींची ओळख द्वारपालांना दिली. भयभीत होऊन जय-विजय या द्वारपालांनी ऋषींची क्षमा मागीतली. भगवान विष्णूकडे त्यांनी मुक्ती मागीतली. अखेर ऋषींनी प्रसन्न होऊन ‘जय विजय यांना मृत्यूलोकात तीन वेळा जन्म घेऊन, श्रीहरींकडूनच मुक्ती मिळेल असा उ:शाप दिला.’ पुढे या वैकुंठाच्या द्वारपालांनी हिरण्याक्ष व हिरण्यकष्यपू या  दैत्यरुपाने जन्म घेतला.

त्यांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने अनुक्रमे वराह व नरसिंह अवतार घेतला.पुढे ही कथा रामायणाशी जोडली जाऊन या दोघांनी रावण व कुंभकर्ण रुपाने जन्म घेतला. त्यांचा विनाश प्रभू श्रीरामाने केला. जय-विजय यांचा तिसरा व अखेरचा जन्म द्वापारयुगात झाला. 

शिशुपाल व दंतवक्र रुपातील या दोघांना भगवान श्रीकृष्णाने मुक्त केले. अखेर आपला शाप पूर्ण करून जय-विजय पुन्हा एकदा वैकुंठधामी सेवेस रुजू झाले.”

वैविध्यपूर्ण आणि सुरस कथांनी भरलेल्या, कधी सुसंगत तर कधी अगदीच विसंगत वाटणाऱ्या विस्मयकारक पुराणकथांकडे मूर्तीकारांचे व त्यांच्या राज्यकर्त्यांचे लक्ष जाणे स्वाभाविकच होते. यातूनच अनेक शिल्पांची निर्मिती झाली. अशाच एका निर्जीव काष्ठशिल्पाची ही  जन्मकथा. वैकुंठातील त्या प्रसंगानंतर जय-विजय यांना सनकादी ऋषींनी दिलेला शाप द्वापारयुगात संपला असला तरी त्यांच्या मूर्त्यांना लाभलेला ‘दुर्लक्षाचा शाप’ कलीयुगातही चालू आहे.


हा शाप त्यांच्यापुरता मर्यादित नसून, ऐतिहासिक वास्तूंनाही या शापाची झळ पोहोचत आहे. उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या इतिहासाकडे आपण डोळे उघडे ठेवून पहायला हवे. या शिल्पाला, आपल्या परिसराच्या इतिहासाला उ:शाप मिळावा यासाठीचाच हा एक लहानसा लेखन प्रयत्न.


-- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

शीतलादेवी

शीतला देवी!      महाराष्ट्रात, गावोगावीच्या वेशींपाशी शेंदूर फासलेले ओबडधोबड आकारातील ग्रामदेवतांचे तांदळे पहायला मिळतात. म्हसोबा, विरोबा, व...